रम ही उसाच्या रसातून निघालेल्या मळीवर किण्वन प्रक्रिया करून बनवली जाते. किण्वन केलेल्या मळीचे शुद्धीकरण करून एजिंग साठी ओक बॅरेल्स मध्ये साठवली जाते. भारतासारख्या ऊस उत्पादक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रमचे उत्पादन केले जाते. अशा या रमचे विविध प्रकार देखील आहेत.
लाईट, गोल्डन, डार्क अशा वेगवेगळ्या प्रकरांमध्ये ती बनवली जाते. पैकी लाईट रम मुख्यतः कॉकटेल्स मध्ये वापरतात. तर गोल्डन व डार्क रमचे प्रत्यक्ष सेवन केले जाते अथवा काही पाक कृतींमध्ये देखील त्याचा वापर केला जातो. उच्च प्रतीच्या प्रीमियम रम मद्यप्रेमिंमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत!
प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये देखील रम सदृश पेयाचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळातील आयुर्वेद तज्ञ वागभट्ट रुग्णांना मध व पाणी यांपासून तयार केलेले मादक पेय आंब्याच्या रसातून पिण्याचा सल्ला देत असत, असा उल्लेख ई.स. ७ व्या शतकातील ग्रंथांमध्ये आहे. काही आजारांवर रम अत्यंत गुणकारी आहे.
मुख्यतः रम ही ऊसाच्या मळीपासून बनवली जाते. मळीमध्ये यीस्ट व पाणी मिसळून तिचे किण्वन घडवून आणले जाते. कोणत्या प्रकारचे यीस्ट वापरले आहे, त्यावरून तिला वेगवेगळी चव प्राप्त होते. त्यानंतर तिचे शुद्धीकरण(distillation) केले जाते व अनावश्यक अशुद्धी काढून टाकल्या जातात.
Distilled rum पुढे कमीत कमी एक वर्ष एजिंग केली जाते. एजिंग कालावधी जितका अधिक तितका रमचा रंग अधिक गडद असतो.तसेच एजिंग प्रक्रियेत ओक बॅरेलस वापरले असतो तर रम डार्क बनते. काही ठिकाणी लाईट रम बनवण्यासाठी स्टेनलेस स्टील टँक देखील वापरले जाते.
Cuba Librae, Pinacolada, Mojito यासारख्या कॉकटेल मध्ये लाईट रम मुख्यतः वापरली जाते. रम बॉल किंवा रम केक यासारख्या अन्न पदार्थांमध्ये देखील फ्लेवरिंग एजंट म्हणून रम वापरली जाते. भारतात रम प्रसिद्ध केली ती कपिल मोहन या अवलियाने!
१८५५ मध्ये जलिआनवाला बाग हत्याकांडातील कर्नल रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर यांचे वडील एडवर्ड अब्राहम डायर या उद्योजकाने ब्रिटीशांची बियरची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या कसौली येथे ब्रुअरी स्थापना केली. नंतर या ब्रुअरीचे मोहन मिकीन
डिस्टीलरी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये रुपांतर झाले. 1960 मध्ये मोहन मिकिनची Old Monk पहिल्यांदा भारतात आली. डोंगरावर राहून तपस्वी जीवन जगणाऱ्या बेनेडिकटाईन भिक्खूंच्या निर्मल जीवनामुळे आणि त्यांनी तयार केलेल्या पेय पदार्थांनी प्रेरित होऊनच Old Monk हे नाव देण्यात आले होते.
एक काळ असा होता की,रम मार्केटमध्ये फक्त Old Monk चे वर्चस्व होते.इतरही ब्रँड्स बाजारात होते परंतु गुणवत्ता व लोकप्रियतेच्या बाबतीत old monk शी स्पर्धाच होऊ शकत नव्हती. Old monk ही ४२.८% मद्यांश असलेली व्हॅनिला फ्लेवरची डार्क रम आहे. उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथे उत्पादन होते.