*सुभाषचंद्र आणि सावरकर या वैचारिक विरोधकांमध्ये समान दुवा होता का?*

नेताजी सुभाषचंद्र बोस
ते 18 ऑगस्ट 1945 ला फॉर्मासा (आत्ताचा तैवान) बेटांवर झालेल्या विमान अपघातात मृत्यू पावल्याचं बोललं जातं. पण त्या भोवती संशयाचं इतकं मोठं धुकं आहे की,'अधिकृत'पणे नेताजी मृत्यू पावलेच नाहीत!
म्हणून जिवंत आहेत! भारतीय लोकांच्या मनात. एक शाश्‍वत प्रेरणादायी स्रोत बनून.
खास बंगाली शैलीच्या गोल चेहर्‍याचे आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे सुभाषबाबू ICS अधिकारी म्हणून निवडले गेले होते. ते सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्याच बळावर, साक्षात गांधीजींचा विरोध असून,
गांधीजींनी देशभर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे पुरस्कृत उमेदवार पट्टाभी सीतारामैय्या यांचा सक्रिय प्रचार करून सुद्धा, सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. देशभरातल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यांच्या पाठिंब्यानं.
तरीसुद्धा त्यांना तत्कालीन पदावरून कारभार करणं अशक्य करून सोडलं.त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

दुसरं महायुद्ध चालू झालेलं होतं.
अशा वेळी त्यांना देशांतर्गत गुंतून न पडता, इंग्रजांच्या नजरकैदेत अडकून न रहाता,
देशाबाहेर पडून स्वातंत्र्यलढा उभा करण्याची सूचना केली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर.
दोन्ही महान व्यक्तिमत्त्वं.दोघांचंही कार्य महान. देशासाठी सर्वस्वाचा निस्वार्थ, निरपेक्ष त्याग महान.
स्वातंत्र्यानंतर भारत देशाची रचना कशी व्हावी याविषयी दोघांचीही 'व्हिजन' स्पष्ट होती.
म्हणूनच दोघे विचारांच्या दोन विरुद्ध ध्रुवांवर उभे असलेले दिसतात.
सुभाषबाबू - जाणीवपूर्वक काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत उतरलेले.
सावरकर - काँग्रेसचे अभिजात, कट्टर विरोधक.
सुभाषबाबूंचा गांधीजींच्या अहिंसा तत्त्वावर विश्‍वास नव्हता, पण स्वातंत्र्यलढ्याची 'स्ट्रॅटेजी' म्हणून त्यांनी अहिंसा (आणि खादी, गांधीटोपी) स्वीकारलेली होती - (याची जाणीव असल्यामुळेच गांधीजींचा सुभाषबाबूंना विरोध होता.)
तर सावरकर सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही पातळ्यांवर स्पष्टपणे अहिंसा नाकारत होते. 'रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले' अशी भूमिका घेऊन सावरकरांनी सशस्त्र लढा संघटित करायचा प्रयत्न केला.

सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी भेटीदरम्यानचा क्षण.
सुभाषबाबूंची विचारधारा, प्रस्थापित अर्थानं ज्याला 'डावी' म्हणतात अशी - साम्यवादी, मुख्यतः मार्क्सवादी होती.
काँग्रेसच्या गांधीवादी प्रभावामुळे अध्यक्ष म्हणून काम करणं अशक्य झाल्यावर सुभाषबाबूंनी प्रथम काँग्रेस अंतर्गत 'फॉरवर्ड ब्लॉक'चा गट स्थापन केला.
काँग्रेस ही त्या काळी एक सर्वसमावेशक राजकीय संघटना होती - पक्ष नव्हता.
काँग्रेसमधे सुद्धा हिंदुत्व किंवा हिंदुराष्ट्रविचार मानणार्‍या व्यक्ती आणि गट होते - पंडित मदन मोहन मालवीय आणि कन्हैय्यालाल मुन्शींसारखे. त्यांची काँग्रेसमध्ये सरदार पटेलांशी जवळीक होती.
पण सुभाषबाबूंच्या ''फॉरवर्ड ब्लॉक''चा वैचारिक पाया मार्क्सवादात होता.नंतर परवापरवापर्यंत 'फॉरवर्ड ब्लॉक' बंगालच्या सत्ताधारी डाव्या आघाडीतला घटक पक्ष होता.
तर त्याच्या सर्वस्वी विरुद्ध सावरकर जवळजवळ जन्मजात, उत्स्फूर्तपणे हिंदुत्ववादी.
भारत 'हिंदुराष्ट्र' असल्याचा विचार त्यांनी आपल्या 1923 साली प्रकाशित झालेल्या 'हिंदुत्व' या ग्रंथातून मांडला.
स्वातंत्र्यानंतर भारताची वाटचाल कशी व्हावी याविषयी सुद्धा दोघांच्या संकल्पनांमधे मूलभूत फरक होते. भारत अजून लोकशाहीसाठी तयार नाही, तसं भारताला तयार करण्यासाठी
स्वातंत्र्यानंतर पहिल्या 10 वर्षांसाठी भारतात लोकप्रिय हुकूमशाही हवी, 10 वर्षांअखेर त्या हुकूमशहानं पायउतार व्हावे आणि देशात लोकशाही लागू करावी असं सुभाषबाबूंचं मत होतं.
तर 'एक व्यक्ती एक मत' या सूत्रावर स्वातंत्र्योत्तर भारत प्रजासत्ताक गणराज्य असावा, ही सावरकरांची दृष्टी.
स्वातंत्र्योत्तर भारताची राष्ट्रभाषा उर्दूप्रधान 'हिंदुस्थानी' ही असावी आणि ती रोमन लिपीत लिहिली जावी - (आत्ताच्या मोबाईलवेड्या तरुण पिढीला किती सोयीचं गेलं असतं!) अशी सुभाषबाबूंची भूमिका होती.
तर सावरकरांची घटनासमितीच्या कामकाजाला वेळोवेळी पाठिंबा देतानाची भूमिका संस्कृतनिष्ठ हिंदी आणि देवनागरी लिपीचं समर्थन करणारी होती. (त्या बाबतीत सावरकरांच्या अनेक भूमिका गांधीजींशी जुळणार्‍या होत्या - पण ते स्वतंत्रपणे, पुन्हा कधीतरी!)
देशाचं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर भारताचं उत्थान.
1940 नंतर तर दोघांचे मार्गसुद्धा समान झाले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
21 जून 1940 रोजी सुभाषबाबू आणि सावरकरांची मुंबईतल्या सावरकर सदनात भेट झाली.
त्यापूर्वी सुभाषबाबूंनी - कलकत्त्यातला दुर्दैवी ' 'ब्लॅक होल ट्रॅजेडी'शी संबंधित ब्रिटिश अधिकारी हालवेल - याचा पुतळा हटवावा अशी मागणी करून आपण त्यासाठी आंदोलन हाती घेणार आहोत असं जाहीर केलं होतं.
21 जून 1940 च्या भेटीत सावरकरांनी सुचवलं
की अशा दुय्यम विषयात गुंतून, त्या नादात तुरुंगात न जाता सुभाषबाबूंनी देशाबाहेर निसटावं, 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या नात्यानं जर्मनी, जपानशी संधान बांधावं'.सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दलचं गूढ आजही कायम आहे.
सावरकर जपानमधील यशबिहारी बसुंशी संपर्कात होते.
यशबिहारी बसुंनी ब्रिटिश सैन्यातून लढलेल्या, पण जर्मनीच्या कैदेत असलेल्या भारतीय सैनिकांना हाताशी धरून 'आझाद हिंद सेना' स्थापन केली होती.
सावरकर दुसर्‍या महायुद्धात भारतीय तरुणांनी सैन्यात भरती व्हावं असं सांगत होते. याला तत्कालीन काँग्रेसचे नेते 'देशद्रोह' म्हणत होते.
सावरकरांचं सांगणं होतं की, देशाला लवकरच स्वातंत्र्य मिळणारच आहे. अशावेळी देशाला देशभक्त, अनुभवी आणि युद्धशास्त्रात तज्ञ असलेलं सैन्य पाहिजे, म्हणून तरुणांनी आत्तापासून सैन्यात भरती व्हावं.

शिवाय ब्रिटिशांकडून लढताना जे भारतीय सैनिक जर्मनी किंवा
जपानच्या कैदेत पडलेले ते आझाद हिंद सेनेत दाखल होऊन स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढू शकतील, अशी सावरकरांची धारणा होती, त्यानुसार सावरकरांनी सुभाषबाबूंना सूचना केली होती. त्यावेळी सावरकरांनी यशबिहारी बसूंचं पत्रही सुभाषबाबूंना दाखवलं होतं.
पुढे सुभाषबाबूंनी 25 जून 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरून बोलताना सावरकरांचा आदरपूर्वक उल्लेख करत आभार मानले होते. सैनिक भरतीला काँग्रेसचे नेते विरोध करत असताना सावरकरांनी सैनिक भरतीला प्रोत्साहन दिलं असं सुभाषबाबू म्हणाले.
यामुळेच थोर समाजवादी विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी सुद्धा, सावरकर, सुभाषबाबूंसहित अनेक क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान होतं असं म्हटलंय. अशाच अर्थाचा संदर्भ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे - चळवळीचे मूळ संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या चरित्रात,
त्यांनी कन्या कॉम्रेड रोझा डांगे यांनी सुद्धा दिला आहे,पुढे मे 1952 मधे 'अभिनव भारत' या संघटनेच्या विसर्जन समारंभात बोलताना सावरकरांनी 'सुभाषबाबूंचं स्वातंत्र्यलढ्याला अजरामर योगदान' असल्याचं सांगितलं.1945 मधे सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना मणिपूरमधल्या मोईरांग-कांगला या
या ठिकाणापर्यंत आली होती. सुभाषबाबूंच्या 'तुम मुझे खून दो मैं तुम्हे आज़ादी दूँगा' या आवाहनानं थरारून उठलेले भारतीय जवान आझाद हिंद सेनेतून लढले.
सुभाषबाबूंची 'चलो दिल्ली' ही झेप, त्या मोईरांग कांगलापाशी रोखली गेली.
हिरोशिमा, नागासाकीवर अनुक्रमे 6 व 9 ऑगस्टला अणुबाँब पडल्यावर जपाननं शरणागती पत्करली आणि 18 ऑगस्ट 1945 नंतर सुभाषबाबूंचं निश्‍चितपणे काय झालं, कधी खात्रीनं सांगता येईल असं वाटत नाही.
सुभाषबाबूंभोवती एक अद्भुतरम्यतेचं वलय कायमच राहणार. त्यांना मनःपूर्वक वंदन.

@ashish_ghanghav
@
You can follow @malianil430.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: