माझा श्राद्धाचा प्रयोग

मृत्यू हा मानवी जीवनाचा शेवट नाही तर केन्द्रबिंदू आहे. आपले सर्व मानसिक शारीरिक व्यवहार जाणते-अजाणतेपणाने मृत्यूभोवती फिरत असतात. सर्वच मानवी संस्कृतींनी मृत्यूच्या गुढतेचा, भीतीचा, अनिश्चिततेचा आपल्या समाजव्यवस्थेत उपयोग करून घेतलेला आहे.
(1)
भारतीय समाजात ब्राम्हणी व्यवस्थेत याच उपयोगाचे रूपांतर अवास्तव कर्मकांडात झाले,त्यातले मुख्य कर्मकांड म्हणजे श्राद्ध.ही कर्मकांडे मोडणे हे स्वतंत्र होऊ इच्छिणार्या प्रत्येका काम आहे असं मी मानतो.

वडिलांच्या वर्षश्राद्धाची मानसिक तयारी काही महिन्यांपासूनच घरी चालू झाली होती.
(2)
आपल्या घरी श्राद्ध होणार नाही हे मी आईला स्पष्ट सांगितलेच होते.त्यानंतर त्रागा चिडचिड अशी एक मोठी फेज आली.त्यानंतर सविस्तर चर्चा झाली.काही आर्ग्युमेंट्स दोन्ही बाजूकडून मांडण्यात आले. श्राद्ध का करायचं?या माझ्या प्रश्नावर आईचे उत्तर आले,"श्राद्ध केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही."
(3)
यावर माझे उत्तर होते,"वडलांना मुक्ती मिळाली नसेल असंवाटतं का तुला?"आता हा कळीचा प्रतिप्रश्न आहे.यावर आई निरुत्तर झाली.तरी तिचे म्हणणे होते मुक्ती मिळाली असली तरी श्राद्ध करायचेच.मी म्हणायचो,का? काहीतरी लॉजिकल कारण सांग. त्यानंतर मग शिव्याशाप त्रागा चिडचिड अशी एक मोठी फेज आली.
(4)
या सर्व प्रकरणात नातेवाईक फार मोठी अवसानघातकी भूमिका वठवतात. फोनवर सतत त्याविषयी बोलून श्राद्ध करण्याचा एक प्रकारे दबाव तयार केला जातो. या दबावतंत्राला मी इलाज शोधून ठेवला होता. मी आईला म्हंटले कोणीही नातेवाईकाने विचारले तर सांगायचे की,मुलगा नाही म्हणतो श्राद्ध करायचे,
(5)
तुम्ही माझ्या मुलाशी बोला. माझ्या तर्कट स्वभावामुळे कोणी नातेवाईक मला फोन करून विचारणार नाहीच,याची मला खात्री होती.वाईट रेप्युटेशन कधीकधी असे कामाला येते.
पण तारीख जशी जवळ येत होती तशी आई श्राद्धासाठी तिचे पूर्ण स्वत्त्व पणाला लावायला लागली. त्यामुळे मी मुत्सद्दी माघार घेतली.
(6)
मी तिला म्हंटले आपण एक डील करू. श्राद्धाचा स्वयंपाक होईल, लोक जेवतील, पण विधी मात्र कोणताच होणार नाही. ना पूजा, ना मंत्र, ना कोणी ब्राम्हण पुरोहित बोलावला जाईल. ते तिला अजिबात पटले नाही.मी म्हणालो,यात काय प्रॉब्लेम आहे? त्यावर तिचे म्हणणे होते की,"मग ते तर रोजच्या सारखेच आहे,
(7)
विधिशिवाय श्राद्ध कसे होईल?"
मी म्हंटले, "तेच तर. मुक्त झालेल्या आत्म्याला मंत्र म्हणून का त्रास द्यायचा? मग आपण फक्त त्यांच्या आठवणीत लोकांना बोलावून जेऊ घालूया." यानंतर पुन्हा त्रागा, चिडचिड यांची एक मोठी फेज आली. आणि सोबत कोरोना पण आला.
कोरोनामुळे पुरोहिताचा प्रश्न सम्पला.
(8)
आणि आईने मनाने सुद्धा बिनाविधीच्या श्राद्धाची गोष्ट मान्य केली. श्राद्धाच्या तारखेच्या जवळ आमच्या एरियात बऱ्यापैकी लोक बाहेर पडत होते आणि पुरोहित मिळणं सहज शक्य होतं तरीही तिने तो विषय काढला नाही. आता तिचे म्हणणे पडले की, ठीक आहे, विधी नको, आपण फक्त गाईला अन्नदान करू.
(9)
मी म्हंटले, कुठले अन्न? ती म्हणाली, नैवेद्याचे ताट गाईला द्यायचे. मी म्हणालो, "शिजवलेले पदार्थ गाईला चालत नाहीत, तिचे पोट फुगते, तिला त्रास होतो. आपण आपल्या समाधानासाठी तिला खायला देतोय की तिच्या समाधानासाठी ? आपण गाईच्या मालकाला पैसे देऊ, तो तिला त्या पैशाचा चारा टाकेल.-
(10)
-गाईला त्यातच आनन्द. असं केलं तरच ती आशीर्वाद देईल." यानंतर पुन्हा त्रागा, चिडचिड यांची एक मोठी पण शेवटची फेज आली.हे शेवटचे म्हणणेसुद्धा आईने मानले. त्यामागे गाईला त्रास देऊन आपल्याला पाप लागेल, ही भावना असली तरीही हरकत नाही, पण तिला हे मान्य झाले याचे खूप समाधान वाटले.
(11)
श्राद्धाच्या दिवशी स्वयंपाक झाला. त्याला फक्त माझा एक गावाला न गेलेला मित्र जेवायला आला. त्याला तेवढंच घरचं चांगलं खायला मिळालं म्हणून तो आनंदी आणि एका परंपरेला टाळता आलं म्हणून मी आनंदी. आईला मात्र आनन्द कशाने झाला असेल हे वाटत नाही.
(12)
या आनन्द नसण्यामागे श्राद्ध तिच्या मनासारखं झालं नाही हे कारण नाहीचय खरंतर.तिला या कर्मकांडात कोणताही आत्मिक आनंद नाही. कदाचित कोणत्याही माणसाला नसतो. पार्टनरच्या जाण्यापुढे जगातली सर्व दुःखे क्षुल्लक वाटतात. त्यामुळे ती आनंदी नसली तरी तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
(13)
आणि माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे.

श्राद्धाचा हा प्रयोग सांगण्यामागचा उद्देश एवढाच की आपण एखादी वस्तू घेण्यासाठी, ट्रिपसाठी वगैरे पालकांकडे हट्ट करतो. त्यासाठी सर्व ट्रिक्स वापरतो. मानसिक क्लेश सहन करतो. तेवढाच प्रयत्न आपण परंपरा मोडण्यासाठी का करत नसू?
(14)
"घरचे ऐकत नाहीत रे" हे खूप लोकांचं ठरलेलं पालुपद असतं. हे कुठेतरी थांबावं लागेल. समाजमाध्यमांवर अनेक बिनमहत्त्वाच्या खाजगी गोष्टी आपण लिहितबोलत असतो, त्यात अशाही गोष्टींचा अंतर्भाव असावा, एवढंच वाटतं.
(शेवट)
You can follow @arvindgj.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: